दक्षिण कोरियात 73 टक्के लोक तणावग्रस्त, पैसे देऊन घेत आहेत शांततेचा शोध
मोबाइल-परिवारापासून पूर्णपणे दूर
दक्षिण कोरियामध्ये लोक कोरोनाचे प्रदीर्घ संकट आणि कामाच्या दबावामुळे वैतागले आहेत. तेथे लोकांमध्ये पैसे खर्च करून शांतता शोधण्याची वृत्ती वाढत चालली आहे. या वृत्तीला ‘हिंटिंग मंग’ नाव देण्यात आले आहे. लॉ फर्ममध्ये काम करणारी 39 वर्षीय हान ये-जंग दीर्घ शिफ्टनंतर मनशांतीच्या शोधात आहे. जीवनात तणाव वाढत चालला असून माझ्या सहकाऱयांनाही हाच अनुभव येत असल्याचे ती सांगते.
कंपन्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत, दांपत्यांमध्ये विसंवाद अन् भांडण सुरू आहेत, कारण त्यांना पैशांची चिंता आहे. अशा स्थितीत लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ‘हिटिंग मंग’ संस्कृती लोकप्रिय होतेय. लोक कुटुंबाशिवाय मनशांती मिळेल अशी जागा शोधत आहेत. यादरम्यान ते पेन आणि नोटपॅडशिवाय अन्य कुठलेच साहित्य बाळगत नाहीत. यांतर्गत दऱयाखोऱया आणि समुद्र किंवा नदीकाठावरील कॅफेत बसून निसर्गाचा आनंद घेत आहेत.
या ठिकाणांवर मौनाचा नियम आहे. अनेक चित्रपटगृहांनी 40 मिनिटांचा ‘फ्लाइट’ चित्रपट दाखविला आणि ‘ढगांदरम्यान थोडा आराम करा’ असे सांगत शुल्क आकारले आहे. जेजू बेटावर एक स्पर्धा घेण्यात आली आणि यात हृदयाचे ठोके सर्वात मंद चालणाऱया व्यक्तीला विजेता घोषित करण्यात आले आहे.
गंगवोन प्रांतात हॅप्पिटरी फौंडेशनने एक ‘तुरुंग’ तयार केला असून तेथे लोक कागद-पेनसह 48 तास राहू शकतात. येथे लोक स्वतःला सामोरे जाण्यासाठी येतात. स्वतःला आवश्यक प्रश्न विचारतात आणि खराखुरा आनंद मिळवितात. कुठल्याही अडथळय़ाशिवाय एकांतात राहण्याचा अनुभव त्यांना भविष्यासाठी सज्ज होण्याची शक्ती देत असल्याचे उद्गार या संस्थेच्या प्रवक्त्या वू सुंग-हुन यांनी काढले आहेत.
आत्महत्येचा दर सर्वाधिक
दक्षिण कोरियन समाज अत्यंत प्रतिस्पर्धात्मक आहे. येथे दुसऱया महायुद्धानंतर पासून मुलांमध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न शालेय दिवसांपासून भरविले जाते आणि येथील तरुणाई भांडवलवादी यशाला कायम ठेवणे स्वतःचे कर्तव्य मानते. या पूर्ण चक्रामुळे एक तणावग्रस्त समाज निर्माण झाला आहे. एका सर्वेक्षणानुसार 73 टक्के लोकसंख्या स्वतःला तणावग्रस्त मानते. औद्योगिक जगात आत्महत्येचा दर दक्षिण कोरियातच सर्वाधिक आहे.