ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार पडत आहे. मनसे आता हिंदुत्त्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या पक्षाच्या झेंडय़ात देखील बदल केला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मनसेने नवीन प्रस्तावित झेंडा निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला असून, त्याला मान्यता मिळाली आहे. उद्या होणाऱया राज्यस्तरीय अधिवेशनात या झेंडय़ाचे अनावरण होऊ शकते.
2006 साली स्थापन झालेल्या या पक्षाच्या पदरी अपयश येत असल्याने मनसेने आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याच ठरवले आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनेदेखील हिंदुत्त्वाची कास धरल्याचे समजते. ‘विचार महाराष्ट्र धर्माचा निर्धार हिंदवी स्वराज्याचा’ अशी टॅगलाईनही त्यांनी अधिवेशनाच्या जाहीरातीत केली आहे.
तसेच मनसेचा नवा झेंडाही भगवा असून, त्यावर राजमुद्रा असल्याचे समजते. उद्याच्या अधिवेशनात या झेंडय़ाची अधिकृत घोषणा होईल.