भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची सीबीआयकडून चौकशी
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोळसा घोटाळय़ाप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाच्याची पत्नी रुजिरा यांची सीबीआयने मंगळवारी पावणे दोन तासांपर्यंत चौकशी केली आहे. सीबीआयने रुजिरा यांना आर्थिक व्यवहार आणि अचानक मालमत्ता वाढण्यासंबंधी अनेक प्रश्न विचारल्याचे समजते. या चौकशीदरम्यान रुजिरा यांच्यासह त्यांचे पती अभिषेकही उपस्थित होते.
तपास यंत्रणेचे पथक अभिषेक यांच्या घरी पोहोचण्यापूर्वी ममता तेथे पोहोचल्या. ममतांनी तेथून बाहेर पडताना अभिषेक यांच्या 8 वर्षीय मुलीला सोबत नेले. चौकशीदरम्यान नात तेथे राहू नये यासाठी ममतांनी हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी सीबीआयने अभिषेक यांची मेहुणी मेनका गंभीर यांची सुमारे 3 तासांपर्यंत चौकशी केली होती. याप्रकरणी अभिषेक यांचे अनेक जवळचे मित्र सीबीआयच्या कचाटय़ात सापडले आहेत.
तृणमूल काँग्रेस संतप्त
अभिषेक बॅनर्जी यांच्याशी संबंधित लोकांच्या घरी तसेच कार्यालयात छापेमारी झाल्याने तृणमूल काँग्रेसचे नेते भडकले आहेत. भाजप बंगाल निवडणुकीकरता सीबीआयची मदत घेत आहे. भाजपला कुठलाच सहकारी नसल्याने सीबीआय आणि ईडीच त्याचे सहकारी झाले आहेत. त्यांच्या मदतीने भाजप अन्य पक्षांना धमकावत आहेत. तृणमूलवरही दबाव टाकला जात असल्याचा आरोप खासदार सौगत रॉय यांनी केला आहे.
गैर काम करणारेच घाबरतात
तृणमूलच्या आरोपांवर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. सीबीआयने याप्रकरणाचा तपास अगोदरच हाती घेतला होता. नोटीस बजावण्याची आणि चौकशी होण्याची ही पहिली वेळ नाही. सीबीआय कायद्याच्या कक्षेत काम करत आहे. चुकीचे काम केल्याने तृणमूल नेते घाबरत असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष घोष यांनी केला आहे.
हजारो कोटींचा घोटाळा कोळसा घोटाळय़ात तृणमूलच्या नेत्यांवर आरोप झाले आहेत. यात अभिषेक यांचेही नाव सामील आहे. बंगालमध्ये अवैध स्वरुपात अनेक हजार कोटी रुपयांच्या कोळशाचे उत्खनन करण्यात आले आणि एका रॅकेटच्या माध्यमातून त्याची काळय़ा बाजारात विक्री करण्यात आली. तृणमूल नेत्यांनी कोळसा घोटाळय़ातून प्राप्त काळा पैसा बनावट कंपन्यांद्वारे चलनात आणल्याचा आरोप आहे. याचा सर्वाधिक लाभ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक यांना झाल्याचा भाजपचा दावा आहे.