होणार कम्युनिस्ट कुटुंबाची सून
तामिळनाडूच्या सलेम जिल्हय़ातील एका तरुण जोडप्याच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. वधू आणि वराचे नाव ममता बॅनर्जी आणि समाजवाद असल्याने लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. 13 जून रोजी म्हणजेच आजच हा विवाह होणार आहे.
इतकेच नाही तर समाजवादच्या परिवाराचा स्वतःचा रोमांचक इतिहास आहे. समाजवादाचे वडिल मोहन यांनी स्वतःच्या तीन मुलांना साम्यवाद (कम्युनिझम), लेनिनवाद आणि समाजवाद (सोशलिझम) अशी नावे दिली आहेत. तर साम्यवादच्या मुलाला म्हणजेच स्वतःच नातवाला त्यांनी मार्क्सवाद हे नाव दिले आहे.
मोहन हे भाकपचे जिल्हा सचिव आहेत. माकपचे राज्य सचिव मुथारासन, आणि भाकपचे राज्य उपसचिव सुब्बारायण एमपी यांच्या उपस्थितीत त्यांच्या मुलाचा म्हणजेच समाजवादचा विवाह होणार आहे. मोहन यांनी एकदा विधानसभा निवडणूकही लढविली होती.
शाळेत शिकत असताना मला आणि माझ्या भावांसाठी अशी नावे असणे चांगले वाटत नव्हते. गावात अनेक अपमान आणि चेष्टेला आम्ही तोंड दिले होते. पण आम्ही महाविद्यालयात गेल्यावर गोष्टी बदलल्याचे समाजवादने सांगितले आहे.
सेलम या भागात साम्यवादाचा प्रभाव आहे. या भागात व्हिएतनाम, चेकोस्लोवाया, मॉस्को, रशिया इत्यादी अनेक नावे माणसांना मिळाली आहेत. तर वधू ममता बॅनर्जी मोहन यांच्या नात्यातीलच आहे. तिचे कुटुंब काँग्रेसचे समर्थक आहे. के. पलानिस्वामी आणि पी. नीलम्बल यांची ममता कन्या आहे. 20 वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये राजकारणात कार्य करत असल्याचे पाहून पलानिस्वामी यांनी स्वतःच्या नवजात मुलीला त्यांचे नाव दिले होते. रविवारी सेलमच्या कट्टूर येथे ममता आणि समाजवादचा विवाह होणार आहे.