आज गांधी पुतळय़ासमोर छेडणार निषेध आंदोलन
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांसाठी अजूनही मतदानाची प्रक्रिया शिल्लक असताना ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला आहे. वादग्रस्त वक्तव्यांवरून वारंवार नोटीस पाठवल्यानंतर आता त्यांना निवडणूक प्रचार करण्यावर चोवीस तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयावर तृणमूलने नाराजी व्यक्त करत हा ‘लोकशाहीसाठी काळा दिवस’ असल्याचे संबोधले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी या कारवाईविरोधात मंगळवारी दुपारी 12 वाजता गांधींच्या पुतळय़ासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी जोरदार प्रचार सुरू असतानाच निवडणूक आयोगाने खुद्द ममता बॅनर्जी यांच्यावरच 24 तासांची प्रचारबंदी लागू केली आहे. सोमवार 12 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून मंगळवारी 13 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत ही बंदी घातली आहे. या बंदीमुळे ममतादीदी मंगळवारी कोणत्याही जाहीर प्रचारसभांना संबोधित करू शकणार नाहीत.
ममता बॅनर्जी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारी वक्तव्ये करत असल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभांमध्ये केलेली वक्तव्ये लोकांना भडकवणारी असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला धक्का पोहोचत असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या कारवाईपूर्वी निवडणूक आयोगाने दोनवेळा ममतांना लेखी नोटीस जारी केली होती.