प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा बँकेचा बेळगाव जिल्हय़ासह सर्व कर्नाटकात नाव लौकीक आहे. इतर बँकांच्या बरोबरीने अत्याधुनिक यंत्रणेसह डिजिटल होत आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील. ठेवी व कर्जावरील व्याज दर हे राष्ट्रीयीकृत बँकांच्या बरोबरीने ठेवलेले आहेत. असे उद्गार बेळगावचे डेप्युटी रजिस्ट्रार श्रीनिवास यांनी काढले.
मराठा बँकेच्या नरगुंदकर भावे शाखेत एटीएम सेवेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते. संचालक बाळासाहेब काकतकर यांनी पाहुण्यांचे स्वाग व परिचय करून बँकेबाबत माहिती देताना सांगितले की मराठा बँक ही बेळगाव जिल्हय़ातील पहिली डिजिटल को- ऑप. बँक आहे. बँकेने आपल्या शाखेमध्ये स्वत:चे एटीएम मशिन बसविले आहे. बँकेच्या वतीने एटीएम, कॅशलेस पेमेंट, आयएमपीएस, पीओएस, ई-कॉम, आरटीजीएस, एनईएफटी, कोअर बँकिंग, एनिवेअर बंकिंग, एसएमएस अलर्ट, गॅस सबसीडी या सारख्या सुविधा दिल्याचे त्यांनी सांगितले.
चेअरमन दिगंबर पवार यांनी बँकेच्या नवीन योजनेबाबतची माहिती देताना सांगितले की, बँकेने राष्ट्रीयीकृत व कमर्शियल बँकांप्रमाणे स्पर्धात्मक कामकाज चालविले आहे. याचाच एक भाग म्हणुन एटीएम मशीन खुले करण्यात आले आहे. आपल्या बँकेच्या ग्राहकांबरोबरच इतर बँकेच्या ग्राहकांनाही एटीएम सेवा मिळणार आहे. लवकरच खानापूर रोड शाखेतही एटीएम सेवा सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यापारी राजु हिडदुग्गी, बेकर्स सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हंगिरकर यांनी बँकेने चालविलेल्या नवीन उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. बँकेचे संचालक बी. एस. पाटील, शेखर हंडे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक तसेच नरगुंदकर भावे चौकातील व्यापारी मारूती सावंत, संजय काकतकर, शशी चोपडे, संजय मणगुतकर आदी उपस्थित होते. व्हा. चेअरमन निना काकतकर यांनी आभार मानले.