ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत बॉलीवूड मधील अनेक कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला कोरोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
प्रियदर्शन जाधव आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतो की, मी सर्वांना कळवू इच्छितो की सर्व नियम पाळूनही माझी कोरोना चाचणी पॉझिविव्ह आली आहे. योग्य उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करावी ही विनंती, सगळ्यांनी काळजी घ्या, असे आवाहनही प्रियदर्शनने यावेळी केले आहे. प्रियदर्शनच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सध्या प्रियदर्शन जाधव ‘लव्ह सुलभ’ या मराठी सिनेमासाठी काम करत आहे. या सिनेमासाठी प्रियदर्शनने लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी सांभाळत असून त्यात प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे हे कलाकार काम करत आहेत.