ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाची धग आता तीव्र झाली आहे. किव्ह ताब्यात आल्यानंतर अन्य ठिकाणी ताबा मिळवण्याचा रशियाचा इरादा आहे. त्यामुळे युरोपात व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली असून, रशियाला रोखण्यासाठी युरोपियन देशांची युनियन एकवटली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला आहे. मला शस्त्र हवी आहेत, मी पळून जाणार नाही, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
27 देशांची युरोपियन युनियन रशियाविरोधात एकवटली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती लवकरच जप्त केली जाऊ शकते. युरोपियन युनियन या संदर्भात कराराच्या अगदी जवळ पोहोचली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना रशियासोबत चर्चेसाठी मध्यस्थ म्हणून काम करण्याचं आवाहन केल्याचे युक्रेनच्या वृत्तसंस्थेनं म्हटले आहे.