गोकाक येथील कंपनीत परराज्यांतूनही गुंतवणूक : संचालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या संपूर्ण जिल्हय़ात गाजत असलेल्या मल्टिलेव्हल मार्केटिंग प्रकरणाविरुद्ध जिल्हा पोलिसांनी आघाडी उघडली असून लवकरच आणखी काही कंपन्यांविरुद्ध कारवाई होणार आहे. गोकाक येथील कंपनीत केवळ बेळगाव जिल्हाच नव्हे तर परराज्यांतूनही गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
गोकाक पोलिसांनी स्टार्टमनी डॉट ईन कंपनीच्या संचालकांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या कंपनीत किती जणांनी गुंतवणूक केली आहे, एकूण रक्कम किती, संबंधितांना परतावा किती देण्यात आला आहे? याची चौकशी करण्यात येत आहे. लवकरच संचालकांना अटक होणार आहे.
गोकाक, बेळगाव, हुबळी-धारवाड, रायचूर जिल्हय़ातून स्टार्टमनी डॉट ईन या ऑनलाईन मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीत कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केवळ कर्नाटकच नव्हे तर हैदराबाद येथूनही गुंतवणूक झाली असून जास्तीत जास्त परतावा देण्याचे सांगून गुंतवणूकदारांना चुना लावण्यात आला आहे.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी गोकाकला भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. खरे तर ऑनलाईन मल्टिलेव्हल मार्केटिंगवर कायद्याने बंदी असूनही गोकाक येथे मोठय़ा प्रमाणात व्यवसाय थाटण्यात आला होता. भीमशी हेगडे व त्याच्या काही साथीदारांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार केवळ गोकाकच नव्हे तर अथणी, चिकोडी, खानापूरसह जिल्हय़ातील आणखी काही तालुक्मयांत मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या कंपन्या मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. गोकाक येथील स्टार्टमनी डॉट ईन या ट्रेडिंग कंपनीवर एफआयआर दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी आपल्या अधिकाऱयांना सूचना केली असून जिल्हय़ात आणखी किती कंपन्या आहेत, त्या शोधून काढून त्यांना कायद्याचा हिसका दाखविण्यासाठी जिल्हा पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.
बेळगाव येथील कंपन्यांचे काय?
अशाच मल्टिलेव्हल मार्केटिंगचा व्यवहार करणाऱया दहाहून अधिक कंपन्या बेळगाव शहर व उपनगरांत सुरू आहेत. मात्र बेळगाव पोलिसांनी या कंपन्यांच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष केले आहे. फशी पडलेल्या नागरिकांनी तक्रार दिल्यास कारवाई करू, या भूमिकेत बेळगाव पोलीस वावरत आहेत. मात्र तक्रार दिली नाही तरी मुळात मल्टिलेव्हल मार्केटिंगचा व्यवहार करणेच चुकीचे आहे. कारण कायद्याने त्याला बंदी आहे. तरीही बेळगाव पोलीस शांतच आहेत. त्यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे.