15 हजार जोडप्यांवर झाले सर्वेक्षण, सरासरी खर्च 22 लाख रुपये
कंपन्यांकडून अनेक स्कीम सादर
कर्ज घेऊन मुलामुलींचा विवाह करणे भारतात नवी गोष्ट नाही. परंतु आता अमेरिकेतही हा प्रकार सुरू झाला आहे. तेथेही ईएमआयवर विवाह होत आहेत. अमेरिकेत महागाई वाढत चालल्याने कर्जाचे प्रमाणही वाढत आहे, अशा स्थितीत जोडपी आता ईएमआयवर विवाह करत आहेत. याकरता रितसर कंपन्या सुरू झाल्या असून त्या वधूच्या पोशाखापासून बँडसह रिसेप्शनपर्यंतचा सर्व खर्च उचलत आहेत. हे एकप्रकारे वेडिंग क्रेडिट ऑफर आहे.
विवाहासाठीची सर्व रक्कम पुढील काळात ईएमआयने भरता येणार आहे. मारु यासारख्या कंपन्या विवाहासाठी ‘बाय नाउ, पे लेटर’ची ऑफर घेऊन आल्या आहेत. या कंपन्यांनी विवाह सोहळय़ाशी निगडित व्हेंडर्ससोबत करार केला आहे. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, हेअर किंवा मेकअप आर्टिस्ट या सर्वांशी या कंपन्यांचा करार झाला आहे.
वेडिंग प्लॅनिंग आणि रजिस्ट्री वेबसाइटच्या 15 हजार विवाहांवर करण्यात आलेल्या एका अन्य सर्वेक्षणात हा खर्च सरासरी 22 लाख रुपये असल्याचे नमूद आहे. अमेरिकेत घरभाडे देणे अवघड ठरले असताना लोकांनी अनेक गरजांवर बंधने आणली आहेत. मोठय़ा शहरातील लोक छोटय़ा शहरांमध्ये राहण्यासाठी जात आहेत. लाखो लोक अमेरिकेतून आता मेक्सिकोत पोहोचले आहेत. अशा स्थितीत विवाहाचा खर्च उचलणे लोकांना अवघड ठरले आहे.
विवाहासारख्या सोहळय़ासाठी रक्कम उभारण्याप्रकरणी बँकांकडून वैयक्तिक कर्जाची उचल करणे हाच लोकांसमोर पर्याय असतो, लोकांकडे आणखीही पर्याय असावेत असे उद्गार मारुच्या मुख्य विपणन अधिकाऱयांनी काढले आहेत.
कंपन्यांचे कार्यस्वरुप
विवाहाची तयारी करणारे जोडपे प्राम व्हेंडरशी संपर्क साधते. वेंडर कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर बिल जमा करतो. त्यानंतर हे जोडपे हे बिल 3, 6 किंवा 12 महिन्यांमध्ये ईएमआयची निवड करून भरू शकते. कंपनी जोडप्यांची वित्तीय पार्श्वभूमी पडताळून पाहत असते. जोडप्याला रक्कम भरणे न जमल्यास कंपनी स्वतःच्या वेंडरला बिलाची रक्कम कमी करण्याची सूचना करू शकते.