9 पैकी 4 गाळेधारकांकडून साडेसहा लाख रुपये भाडे जमा
बेळगाव / प्रतिनिधी
महात्मा फुले मार्केटमधील गाळेधारकांनी वर्षभरापासून भाडे थकविल्याने गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली होती. 9 पैकी 4 गाळेधारकांनी साडेसहा लाख रुपये भाडे जमा केले. त्यामुळे 4 गाळय़ांचे टाळे खोलण्यात आले. मात्र, उर्वरित गाळेधारकांनी अद्यापही रक्कम जमा केली नाही.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भाडे थकविल्याने कारवाईचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी बजावला होता. याची दखल घेऊन महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी गाळेधारकांना भाडे भरण्याची सूचना केली होती. तरीदेखील याची दखल गाळेधारकांनी घेतली नाही. त्यामुळे एक वर्षाहून अधिक भाडे थकविलेल्या गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मंगळवारी 9 गाळय़ांना टाळे ठोकण्यात आले होते. मात्र, काही गाळेधारकांनी तातडीने भाडय़ाची रक्कम जमा केली. काहांनी बुधवारी सकाळी भाडय़ाची रक्कम जमा केल्याने गाळय़ांचे टाळे खोलण्यात आले. बुधवारपर्यंत चार गाळेधारकांनी भाडे भरले असून उर्वरित गाळेधारकांनी भाडे जमा केले नाही.
उद्या आणखी एका मोठय़ा व्यापारी संकुलातीलगाळय़ांना टाळे ठोकण्यात येणार
शहरातील विविध भागात असलेल्या व्यापारी संकुलांतील गाळय़ांचे भाडे मोठय़ा प्रमाणात थकले आहे. त्यामुळे वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. मटण मार्केट पाठोपाठ महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई केली. भाडे थकविलेल्या गाळेधारकांना भाडे भरण्याची सूचना केली आहे. शुक्रवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर भाडे जमा न केल्यास शुक्रवारी आणखी एका मोठय़ा व्यापारी संकुलातील गाळय़ांना टाळे ठोकण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.