सांगली /प्रतिनिधी
महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी नगर अभियंता पांडव यांच्यासह सांगली जिल्हा निवारा संघाच्या प्रतिनिधींच्या बरोबर संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. चर्चेमध्ये कापडणीस यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घरकुले देण्याची प्रक्रिया सुरु करीत आहोत.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पहिल्या टप्प्यात 139 लाभार्थींना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार वाल्मीकी आंबेडकर वसाहतीमध्ये घरकुले आवश्यक दुरुस्ती करून लाभार्थींच्या ताब्यात देण्यात येतील.
या निर्णयाचे सांगली जिल्हा निवारा संघाचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी स्वागत केले असून, घरकुल देण्याबाबतची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त यांचे आभार मानले. कापडणीस म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयातील 1301 बेघरांची यादी नगर अभियंता यांनी तपासून घ्यावी, पाहणी करावी आणि उर्वरित लोकांना अर्ज करण्याबाबत निरोप द्यावा.
या महत्त्वपूर्ण बैठकीत कॉ शंकर पुजारी यांच्यासह कॉविजय बचाटे, नंदा कामठे, शिराज शेख, विशाल बडवे, मीना लोखंडे, लीला लोखंडे इत्यादींचा समावेश होता.