तिसऱया किंवा चौथ्या आठवडय़ात महापौर-उपमहापौर निवडीची शक्यता
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे राजपत्रात नोंद झाली असून आता महापौर-उपमहापौर निवडणुकीची प्रतीक्षा आहे. मात्र कोणत्या आरक्षणानुसार महापौर निवड करायची? याबाबतचे स्पष्टीकरण शासनाकडून आले नाही. त्यामुळे शासनाच्या स्पष्टीकरणाकडे आणि महापौर निवडीच्या तारखेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणूक होऊन एक महिना होत आला आहे. पण नव्या सभागृहाच्या स्थापनेसाठी प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नावाची नोंद राजपत्रात झाली आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक कधी होणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पण महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये सभागृहाची मुदत संपुष्टात आली होती. त्यामुळे महापालिका निवडणूक घेणे गरजेचे होते. पण निवडणुकीस अडीच वर्षांचा विलंब झाला असून 21 व्या कार्य कालावधीसाठी महापौर-उपमहापौरांची निवड होणार आहे. सभागृह अस्तित्वात नसताना नगरविकास खात्याने 21, 22 आणि 23 व्या कार्य कालावधीच्या महापौर-उपमहापौर निवडीचे आरक्षण जाहीर केले आहे.
त्यामुळे यापैकी कोणत्या आरक्षणानुसार निवडणूक घ्यायची? असा संभ्रम महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेने नगरविकास खात्याला पत्र पाठवून कोणत्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवड करायची? याबाबतचे स्पष्टीकरण विचारले आहे. पण नगरविकास खात्याकडून अद्याप याबाबत कोणतेच प्रत्युत्तर आले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कौन्सिल विभागाला नगरविकास खात्याच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतरच महापौर-उपमहापौर निवडणुकीची घोषणा होणार आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत नगरविकास खात्याचे स्पष्टीकरण आल्यानंतर लागलीच निवडणूक घेण्यात येणार आहे. ऑक्टोबरच्या तिसऱया किंवा चौथ्या आठवडय़ात महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याचा कौन्सिल विभागाचा प्रस्ताव आहे. महापालिका कायद्यानुसार प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापौर-उपमहापौर निवड होणार असून स्पष्टीकरण आल्यानंतर निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शासनाने जाहीर केलेले महापौर-उपमहापौर आरक्षण
कार्य कालावधी | महापौर आरक्षण | उपमहापौर आरक्षण |
21 वा | सामान्य महिला | मागासवर्गीय ‘ब’ महिला |
22 वा | मागासवर्गीय महिला | सामान्य |
23 वा | सामान्य | सामान्य महिला |