मनपाने राजपत्राची प्रत प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविली : तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
नगरविकास खात्याने नवीन राजपत्राची प्रत प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविली असल्याने महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच महापौर-उपमहापौर निवडणूक होण्याची शक्मयता आहे.
महापालिका निवडणूक होऊन सहा महिने झाले. पण अद्याप महापौर-उपमहापौर निवड झाली नसल्याने लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले नाही. मागील तीन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. मनपा निवडणूक होऊनदेखील प्रशासकीय राजवट सुरू असल्याने लोकनियुक्त सभागृहाची स्थापना कधी होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. प्रशासकीय राजवटीमुळे महापालिकेतील कामकाज पूर्णपणे कोलमडले आहे. कार्यालयातील अधिकाऱयांच्या अंतर्गत भांडणामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिका कार्यालयातील अनेक टेबलवर अधिकारी नसल्याने नागरिकांना कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत.
निवडणुकीतील अडथळे हटले
महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यामध्ये आरक्षण आणि राजपत्राचा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता. पण 21 व्या कार्यकालावधीच्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात यावी असे स्पष्टीकरण शासनाने दिले आहे. तसेच नगरसेवकाचे नाव, आरक्षण आणि वॉर्डचे आरक्षण अशी सर्व माहिती असलेले राजपत्र नगरविकास खात्याने पाठविले आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीतील अडथळे हटले आहेत. आतातरी निवडणूक होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या कौन्सिल विभागाने प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविला आहे. पण राजपत्रातील माहिती परिपूर्ण नसल्याची टीपणी प्रादेशिक आयुक्तांनी केली होती. त्यामुळे परिपूर्ण माहिती असलेल्या राजपत्राची प्रत नगरविकास खात्याने दिली असल्याने ही प्रत महापालिकेच्यावतीने सोमवारी प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आतातरी महापौर-उपमहापौर निवडीची तारीख निश्चित होणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.