सातारा / प्रतिनिधी :
कोरोनामुक्त असलेल्या महाबळेश्वरमध्ये 23 दिवसांनी एक कोरोना रूग्ण आढळून आला. मात्र, हा रूग्ण शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वेण्णालेक परीसरात असल्याची माहीती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. दरम्यान, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे कोटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले आहे
महाराष्ट्राचे नंदनवन व प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर हे गेली तीन आठवडे कोरोना मुक्त होते. येथे विविध राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ वाढू लागली होती. रोज हजारो पर्यटक येत होते. या पर्यटकांपासून शहरवासियांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणुन शहरातील व्यापारी योग्य ती खबरदारी घेत होते. त्याचप्रमाणे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय पर्यटकांना शहरात प्रवेश दिला जात नव्हता आणि जरी प्रवेश मिळाला तरी त्यांना हॉटेल अथवा लॉज मध्ये रूम मिळत नव्हत्या. त्यामुळे पर्यटकांकडून शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. 30 जुलै रोजी आलेल्या अहवालात एका व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित आल्याने पुढील चौदा दिवस महाबळेश्वर शहराला कोरोना मुक्तीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. महाबळेश्वर शहरात आज अखेर 801 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. या पैकी 779 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर 22 रूग्णांना या कोरोना महामारीमध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत.