प्रतिनिधी / महाबळेश्वर :
महाबळेश्वर पर्यटनस्थळावरील सर्वच प्रेक्षणीय पॉईंट, स्थळे खुली करण्यात आली असून, आता महाबळेश्वरचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेला वेण्णालेक नौकाविहारही शनिवारपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. नुकतीच प्रशासनाच्यावतीने प्रेक्षणीय स्थळे सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर वेण्णालेक नौकाविहार पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल या परिसरात अनुभवायास मिळत आहे.
महाबळेश्वर-पाचगणीचे वैभव असलेली प्रेक्षणीय स्थळे ”कोविड 19” च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली पाच ते सहा महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. दुसरी लाट ओसरत असताना इतर निर्बंध शिथिल केल्याने पर्यटकांची पाऊले हळूहळू का होईना महाबळेश्वर पर्यटनस्थळाकडे वाळू लागली आहेत. मात्र महाबळेश्वरच्या मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेला वेण्णालेक नौकाविहार, प्रमुख ऑर्थरसीट पॉईंट, केट्स पॉईंट पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेला ओसंडून वाहणारा लिंगमळा धबधबा ही अन् अशी अनेक प्रमुख ठिकाणे मात्र पर्यटकांसाठी बंदच होती. आ. मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने नुकतीच प्रेक्षणीय स्थळे सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येथील सर्वच प्रेक्षणीयस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.