महाबळेश्वर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा महाबळेश्वर तालुक्याला चांगलाच तडाखा बसला आहे. गेले दोन दिवस वादळी वारे आणि मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चक्रीवादळामुळे महाबळेश्वर तालुक्यात झाडे उन्मळून पडणे, घराचे छप्पर उडणे, अंगणवाडी शाळांच्या इमारतींचे नुकसान, पाणी पुरवठा बंद पडणे, वीज गायब होणे, नदीनाल्यांना अचानक पूर येणे, गुरांचे गोठे, पाॅलिहाऊस, संरक्षक भिती पडणे अशा घटनांच्या मालिकांमुळे तालुक्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच ठिकाणी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही.
घरांची मोठ्या प्रमाणात पडझड : तालुक्यातील किल्ले प्रतापगड, राजपूरी, भेकवली, चिखली, देवळीमुरा, कोंढोशी येथे घरांचे छप्पर उडणे, भिंती कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले आहे . चिखली गावातील अंगणवाडी शाळेची इमारतीचे छप्पर उडाले तर, कासरूड येथील प्राथमिक शाळेचे नुकसान झाले आहे.
वीज गायब : मुसळधार पावसामुळे वीजवितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात विजेचे खांब व विद्युत तारा पडल्यामुळे शनिवार रविवार सोमवार संपूर्ण तालूका अंधारात बुडाला आहे. शनिवार पासून वीज पुरवठा बंद आहे. खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीजवितरण विभागाचे कर्मचारी तारेवरची कसरत करत आहेत तरी देखिल सोमवारी रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता.
पाणीपुरठ्यावर परिणाम : शनिवार पासून वीज गायब झाल्यामुळे त्याचा परिणाम महाबळेश्वर पाचगणी सह तालुक्यांतील विविध गावांतील पाणी पुरवठा योजनांवर झाला आहे. शनिवार पासून महाबळेश्वर पाचगणी सह अनेक गावांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. वीज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. महाबळेश्वर पालिकेने टॅंकर भरुन ठेवले असून मागणी केल्यास पुरवण्यासाठी तयारी करुन ठेवली आहे अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली .
अचानक आलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोमवार दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी वादळी वारे काही कमी झाले नाही. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णालेक पाणीपातळीत वाढ झाली आहे. लिंगमळा धबधब्यावरून ही कोसळणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन मे महिन्यात लिंगमळा धबधब्या वरून कोसळनाऱ्या जलप्रपाताचे दृश्य मोठे विलोभनीय दिसत आहे.