संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (युएनडीपी)च्या एका नव्या अध्ययनात कोविड-19 महामारीच्या गंभीर दीर्घकालीन परिणामांपोटी 2030 पर्यंत आणखीन 20 कोटी 70 लाख लोक दारिद्रय़ात लोटले जाऊ शकतात, असे दिसून आले आहे. हा निष्कर्ष सत्यात उतरल्यास जगभरात अत्यंत गरीब लोकांची संख्या 1 अब्जांहून अधिक होणार आहे. अध्ययनात कोविड-19 मुळे निरंतर विकास लक्ष्यांवर (एसडीजी) पडणारा प्रभाव आणि महामारीमुळे पुढील दशकापर्यंत पडणाऱया बहुआयामी प्रभावांचे आकलन करण्यात आले आहे.
हे अध्ययन युएनडीपी आणि डेनवर विद्यापीठात ‘पारडी सेंटर फॉर इंटरनॅशनल फ्यूचर्स’दरम्यान दीर्घकालीन भागीदारीचा हिस्सा आहे. अध्ययनानुसार कोविड-19 महामारीच्या गंभीर दीर्घकालीन परिणामांपोटी 2030 पर्यंत आणखीन 20 कोटी 70 लाख लोक हलाखीच्या स्थितीत लोटले जाऊ शकतात.
वर्तमान मृत्यूदर आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या वृद्धी दर अनुमानाच्या आधारावर ‘बेसलाइन कोविड’ स्थिती अंतर्गत महामारीपूर्वी जग ज्या विकासाच्या मार्गावर होते, त्याच्या तुलनेत 4 कोटी 40 लाख अतिरिक्त लोक 2030 पर्यंत हलाखीच्या दारिद्रय़ात सापडू शकतात. ‘हाय डॅमेज’ स्थितीच्या अंतर्गत कोविड-19 मुळे 2030 पर्यंत आणखीन 20 कोटी 70 लाख लोक आत्यंतिक दारिद्रय़ात लोटले जाऊ शकतात. सद्यकाळात निवडण्यात येणारे पर्याय जगाला विविध दिशांमध्ये नेऊ शकतात, असे उद्गार युएनडीपीचे प्रशासक अचिम स्टीनर यांनी काढले आहेत.