प्रतिनिधी / वास्को :
वास्कोतील चिखली ते हेडलॅण्ड सडापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याबद्दल वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांविरूध्द तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा अधिकाऱयांविरूध्द मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
वास्कोतील विशेषत: वाडे वास्को येथील रस्त्यावर सततच्या पावसामुळे खड्डे पडलेले असून वाहतुकीला या स्थितीचा बराच त्रास होत आहे. लोकांचे हे कष्ट दूर करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी त्वरीत हाती घ्यायला हवे. व या कामात दर्जाही ठेवायला हवा. मात्र, या कामात हलगर्जीपणा होत असून मागच्या वर्षीही खड्डे बुजवण्याचे काम व्यवस्थीत झाले नव्हते. या विषयी अभियंत्यांना वारंवार कल्पना देऊनसुध्दा दुर्लक्ष झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनीही रस्त्यावरील खड्डे योग्य पध्दतीने आणि योग्यवेळी बुजवण्याची सक्त सुचना अभियंत्यांना केली होती. मात्र, हे अधिकारी आपले कर्तव्य योग्य पध्दतीने बजावत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा या प्रश्न लक्ष घालून संबंधीत अधिकाऱयांविरूध्द कारवाई हाती घ्यावी अशी मागणी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केली आहे.
चिखली ते हेडलॅण्ड सडा व्हाया वास्को शहरातील या महामार्गाचे डांबरीकरण करण्याची शासकीय प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. मात्र, आता पावसाळा संपल्यानंतरच हे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते त्वरीत व योग्यपध्दतीने बुजवून वाहतुकीचा त्रास दूर करण्याचे कष्ट शासकीय अभियंत्यांनी घ्यायला हवेत असे आमदार आल्मेदा यांनी म्हटले आहे.