नागपूर-गोंदियामधील रहिवासी : सीआरपीएफच्या 117 व्या बटालियनमध्ये कार्यरत
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्हय़ात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एका जवानाला वीरमरण आले. नरेश उमराव बडोले (वय 49) असे त्यांचे नाव असून ते गोंदिया जिल्हय़ातील अर्जनी तालुक्मयातील बाम्हणी गावचे रहिवासी होते. मात्र, सध्या त्यांचे कुटुंबीय नागपूरमध्ये वैशालीनगर हिंगणा रोड येथे राहत होते. ते सध्या काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या 117 व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. बडोले यांना वीरमरण आल्यानंतर नागपूर-हिंगोलीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. तसेच कुटुंबीयही शोकसागरात बुडाले आहे.
बडगाम जिल्हय़ात दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 117 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. 25 एप्रिल 1971 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर 1989 मध्ये ते केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये रुजू झाले होते.
बंदिपोरा परिसरात दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात बडोले जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी नरेश बडोले यांची रायफल घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. नरेश बडोले यांना तात्काळ लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीनंतर संबंधित भाग सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या भागात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत या भागात शोधमोहीम सुरू होती. मात्र, सुरक्षा पथकाला दहशतवाद्यांचा शोध घेण्यात यश आले नव्हते.
पुलवामातील चकमकीत दहशतवादी ठार
बडगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पुलवामा जिल्हय़ातही एका ठिकाणी गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आल्याचे सांगण्यात आले. दक्षिण काश्मीरमधील भागंदर त्राल भागात ही चकमक झाल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले.