ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यातच मागील 24 तासात 442 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली तर 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 16 हजार 015 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 163 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 16,015 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1736 पोलीस अधिकारी आणि 14,279 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 13 हजार 014 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1326 पोलीस अधिकारी आणि 11,688 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2838 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 395 पोलीस अधिकारी आणि 2443 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत झालेल्या 163 मृत्यूंमध्ये 15 पोलीस ऑफिसर आणि 148 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.