माजी नगरसेविका मेघा हळदणकर यांचे प्रतिपादन : यशोधरा महिला मंडळाच्या हळदीकुंकू समारंभात महिलांना मार्गदर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
महिलांचा प्रत्येक क्षेत्रात सहभाग हवा, त्याकरिता शासनाने 50 टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव ठेवले आहे. त्यामुळे महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. समाजकार्यातही महिलांनी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असल्याचे मत माजी नगरसेविका मेघा हळदणकर यांनी व्यक्त केले.
कोनवाळ गल्ली येथील यशोधरा महिला मंडळाच्यावतीने समुदाय भवन येथे हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून मेघा हळदणकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक माजी महापौर सरिता पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका वैशाली हुलजी आणि माया कडोलकर उपस्थित होत्या. याप्रसंगी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मंडळाच्या अध्यक्षा व कार्याध्यक्षा माजी महापौर सरिता पाटील उपस्थित होत्या. हळदीकुंकूनिमित्त महिलांसाठी मनोरंजनपर कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमहापौर यांनी स्पर्धा घेतल्या. यावेळी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
कार्यक्रमप्रसंगी यशोधरा महिला मंडळाच्या सदस्या वीणा सूर्यवंशी, सुषमा कोवाडकर, सुकन्या पाटील, रुपा नावगेकर, रेणुका मोहिते, लता निकम, सुजाता जेलुगडेकर, डॉ. कौमुदी पाटील, राजश्री मोरब, नीता निकम, सरिता नावले, तुळसा भागाणगेकर, अनिता तरळे आदींसह महिला उपस्थित होत्या. आभार मंडळाच्या उपाध्यक्षा सुषमा कोवाडकर यांनी मानले.
मराठा महिला संघटना
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विवाहसंदर्भात अनेक अडचणी येतात. विवाह जुळवताना फक्त गुण मिलन बघणे आवश्यक नसून ग्रह मिलनही होणे आवश्यक आहे. जीवनात पैशाची अडचण असेल तर कोणते उपाय करावेत, याविषयी ज्योतिषतज्ञ उषा सुभेदार यांनी सविस्तर माहिती दिली. मराठा महिला संघटनेने आयोजित केलेल्या हळदीकुंकू व तिळगूळ समारंभात त्या प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलत होत्या. तसेच त्यांनी यावेळी महिलांच्या असलेल्या ज्योतिषशास्त्राबद्दल अडचणींचे निरसन देखील केले. यावेळी व्यासपीठावर ज्योतिषतज्ञ उषा सुभेदार, प्रिया कोलवेकर, दानेश्वरी बिल्लर आदी उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी मनीषा चव्हाण, सुचिता भातकांडे, शितल सिनुचे, आरती जाधव, भक्ती भातकांडे यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी मराठा मंडळ संघटनेच्या अध्यक्षा सुधा भातकांडे यांनी महिलांनी स्वावलंबी बनावे. फक्त चूलमूल न करता स्वताःसाठी काहीतरी करावे अथवा एक छोटा गृह उद्योग तरी चालू करावा, असे मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी प्रिया कोवळेकर आणि दानेश्वरी बिल्लूर यांनी उपस्थित महिलांना स्वतःची काळजी कशी घ्यावी, तसेच कर्करोगाबद्दल आणि इतर विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन माधवी अष्टेकर यांनी केले तर गीता जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महिला मंडळ संघटनेच्या सभासद भगिनी, परिसरातील महिला वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.
भाग्यनगर येथील भाग्यलक्ष्मी महिला मंडळ
भाग्यनगर येथील भाग्यलक्ष्मी महिला मंडळातर्फे तिळगूळ समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा सविता हेब्बार होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रिया पुराणिक, सुधा रोट्टी व साधना पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी सुजाता देशपांडे, प्रिया कल्याणशेट्टी, मेघा देसाई यांनी स्वागतगीत म्हटले.
पद्मा पाटील व शोभा कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रिया पुराणिक यांनी महिलांचा आत्मविश्वास कसा वाढविता येईल, यावर विचार व्यक्त केले. सुधा रोट्टी यांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगितले. साधना पाटील यांनी महिला उद्योजकतेबद्दल माहिती दिली. सविता हेब्बार यांनी आभार मानले.