चमोली येथील नैसर्गिक आपत्ती – जगातील 7 सर्वात उंच शिखरांवर फडकविला आहे तिरंगा
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडच्या चमोलीत आपत्तीने बरंच काही उद्ध्वस्त केले आहे. रविवारी कामासाठी बाहेर पडलेले अनेक जण अद्याप स्वतःच्या घरी पोहोचू शकलेले नाहीत. कुणाचा मुलगा तर कुणाचे आईवडिलच बेपत्ता आहेत. तर काही जणांचा भाऊ तर कुणाच्या पत्नीचा थांगपत्ता लागलेला नाही. आयटीबीपीचे जवान बचावकार्य करत असलेल्या ठिकाणी या सर्व कुटुंबीयांच्या नजरा केंद्रीत झाल्या आहेत. या बचाव पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी अपर्णा कुमार यांच्याकडे आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या बचावमोहिमेची धुरा अपर्णा यांना सरकारने सोपविली आहे. आयटीबीपीच्या महासंचालिका असलेल्या अपर्णा या मूळच्या कर्नाटकाच्या शिवमोगा येथील रहिवासी आहेत. 2002 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी असलेल्या अपर्णा यांचे शिक्षण कर्नाटकातच झाले असून त्यांनी एलएलबीची पदवी मिळविलेली आहे. त्यांचे पती संजय कुमार हे उत्तरप्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
‘7 समिट्स’ म्हणजेच जगातील 7 सर्वात उंच शिखरांवर तिरंगा फडकविणाऱया अपर्णा कुमार देशाच्या पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी माउंट एव्हरेट, माउंट किलिमंजारो, माउंट एल्ब्रुस, कार्सटेंन्स पिरॅमिड, विन्सन मॅसिफ, माउंट एकांकागुआ आणि माउंट डेनाली सर करण्यास यश मिळविले आहे. ही सर्व शिखरे 7 विविध खंडांमधील आहेत.
वयाच्या 39 व्या वर्षापासून गिर्यारोहणास प्रारंभ
मसुरीत प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण घेत असताना अपर्णा यांनी सर्वप्रथम हिमाच्छादित शिखरे पाहिली होती. तेव्हाच त्यांनी या शिखरांना गवसणी घालण्याचा निश्चय केला होता. पण स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिले पाऊल टाकण्याकरता त्यांना 11 वर्षे लागली. 2013 मध्ये त्यांनी माउंटेनियर फौंडेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला तेव्हा त्या 39 वर्षांच्या होत्या.
2014 पासून गिर्यारोहण
माउंटेनियर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी आफ्रिकेतील सर्वात उंच किलिमंजारो (19,340 फूट)s शिखर सर केले. त्याचवर्षी ऑस्ट्रेलिया आणि ओशिनिया येथील सर्वात उंच शिखर कार्स्टेन्स पिरॅमिडवर (16,024 फूट) तिरंगा फडकविला. 2015 मध्ये अर्जेंटीनातील एकॉनकागुआ हे (22,840 फूट) शिखर सर केले. त्याचवर्षी रशियातील कोकेशियान पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर एल्ब्रुस (18,510 फूट) गाठण्यास त्या यशस्वी ठरल्या. 2016 मध्ये अंटाक्&िटकातील विन्सन मासिफ (16,050 फूट) शिखर त्यांनी सर केले. त्याचवर्षी जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टवर त्यांनी तिरंगा फडकविला.
दक्षिण ध्रूवावर पोहोचल्या
2018 मध्ये नेपाळमध्ये असलेले जगातील आठव्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर मानसालुवरही त्यांनी तिरंगा फडकविला होता. दक्षिण ध्रूवावर पोहोचणाऱया अपर्णा या पहिल्या भारतीय अधिकारी आहेत. 2019 मध्ये उणे 40 अंश तापमानात त्या दक्षिण ध्रूवापर्यंत पोहोचल्या होत्या. 2019 मध्येच त्यांनी अमेरिकेच्या माउंट डेनाली सर करत 7 समिट्सवर गिर्यारोहण करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.