वृत्तसंस्था / मस्कत
महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या अ गटातील दुसऱया सामन्यात विद्यमान विजेत्या जपानने भारताचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्या सामन्यात मलेशियाचा 9-0 असा दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिल्यानंतर बलाढय़ जपानविरूद्धच्या दुसऱया सामन्यात भारतीय संघाची कामगिरी दर्जेदार होवू शकली नाही. रविवारच्या सामन्यात दुसऱया मिनिटाला युरी नागाईने जपानचे खाते उघडले. 42 व्या मिनिटाला साकी तनाकाने जपानचा दुसरा गोल नोंदविला. जपानने या सामन्यात विजयासह तीन गुण मिळविले. जपानने दुसऱया मिनिटाला आपले खाते उघडल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघावर चांगलेच दडपण आले. भारताच्या आघाडीफळीने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. मध्यंतरापर्यंत जपानने भारतावर दोन गोलांची आघाडी घेतली होती. भारताच्या आघाडीफळीतील नवनीत कौर, शर्मिला देवी, लालरेमसियामी आणि वंदना कटारिया यांच्या चढाया जपानच्या बचावफळीने तसेच गोलरक्षकाने थोपविल्याने भारताला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. दीप ग्रेस किंवा उर्जित कौर यांना जपानच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारूनही गोल करता आला नाही. या स्पर्धेत आता अ गटात भारताचा तिसरा सामना सिंगापूरबरोबर सोमवारी खेळविला जात आहे.