दावा फेटाळत मानसिक रोगी असल्याचे केले वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केरळच्या तिरुवनंतपूरम येथील 45 वर्षीय करमाला मोडेक्स हिने प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आपल्या आई असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी जिल्हा कुटुंब न्यायालयात पौडवाल यांच्याविरोधात दावा दाखल करण्यात आला असून, 50 कोटी रुपयांची मागणीही केली आहे. अनुराधा पौडवाल त्या महिलेच्या दाव्यावरून चांगल्याच भडकल्या. ती महिला मानसिक रोगी असल्याचे सांगत पौडवाल यांनी त्या महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
त्या महिलेला फक्त पैसे उकळायचे असून, तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्याचबरोबर कोर्टाने हे प्रकरण कोणत्या आधारावर दाखल करून घेतले, हेच आश्चर्यकारक आहे, असेही पौडवाल म्हणाल्या. करमाला या महिलेने केलेल्या दाव्यानुसार, तिचा जन्म 1974 ला झाला असून, त्यावेळी ती चार दिवसांची असताना पौडवाल यांनी तिला पोन्नाचन आणि ऍग्नेस या दाम्पत्यांकडे सोपवले होते. त्यावेळी माझे वडील लष्करात होते. तसेच अनुराधा आपल्या करिअरमध्ये व्यस्त असल्यामुळे माझी जबाबदारी घेण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी मला पोन्नाचन आणि ऍग्नेस या दाम्पत्यांकडे सोपवले होते. आता मला माझी आई परत मिळावी म्हणून मी कुटुंब न्यायालयाकडे मागणी केली आहे, असे करमाला हिने सांगितले आहे.