ऑनलाईन टीम / मुंबई :
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला सायबर चोरांनी गंडा घातला आहे. केवायसी अपडेट करण्याचे कारण देत कांबळीच्या बँक खात्यामधून सायबर चोरांनी 1 लाख 13 हजार 998 रुपये काढले आहेत.
कांबळी यांना 3 डिसेंबर रोजी मोबाईलवर एक फोन आला. समोरच्या व्यक्तेने आपण कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असून, तुमच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट नसल्याचे सांगितले. केवायसी अपडेट न केल्यास तुमचे खाते बंद होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी कांबळी यांनी केवायसी अपडेट करण्याचा निर्णय घेतला. त्या व्यक्तीने कांबळी यांना एक लिंक पाठवली. या लिंकवर जाऊन एनीडेस्क ऍप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी देण्यास सांगितले. ओटीपी देताच त्या व्यक्तीने कांबळीच्या मोबाईलचा एक्सेस घेतला आणि त्यांच्या खात्यातील 1 लाख 13 हजार 998 रुपये काढून घेतले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने कांबळींसोबतचा संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळी यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या संदर्भात मंगळवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.