बॉलिवूड अभिनेती कल्कि कोचलिनला देखील अन्य महिलांप्रमाणेच गरोदरपणादरम्यान होणाऱया समस्यांना तोंड द्यावे लागले होते. कल्कि लवकरच स्वतःच्या पुस्तकात मातृत्वाशी संबंधित अनुभव मांडणार आहे.
गरोदरपणा आणि आई होण्यादरम्यान येणाऱया अडचणींबद्दल फारच कमी लोक बोलतात. हा अत्यंत सुखद अनुभव असतो असे आम्ही केवळ ऐकतो. आई होणे एका महिलेसाठी निश्चितपणे आनंदाची अनुभूती असते. पण यादरम्यान अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक परिवर्तन झेलावे लागतात असे कल्किने म्हटले आहे.
गरोदरपणादरम्यान अचानक मी स्वतःमधील ऊर्जाच गमाविली होती. योग्यप्रकारे विचार करू शकत नव्हते तसेच कुठलेच काम हातून होत नव्हते. एक वेळ अशीही आली, जेव्हा मला माझ्या शरीराबद्दल चीड होत होती. मी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हते. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजेच प्रसुतीनंतरच्या नैराश्याला तोंड देत होते. झोप देखील पूर्ण होत नव्हती असे ती सांगते.
अनेकदा मी स्वतःला एकटी समजत हेते. आम्ही लॉकडाउनमध्ये होतो, लोकांना भेटू शकत नव्हतो. याचमुळे हे सामान्य आहे की नाही हे मला माहीत नाही. प्रत्येक महिला याच अवस्थेतून जाते का हे मला जाणून घ्यायचे असल्याचे तिने म्हटले आहे.