भाऊराव काकतकर महाविद्यालयात मराठी भाषादिन
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या मातृभाषेवर आपण प्रेम केले पाहिजे. तिचे जतन केले पाहिजे. ती आपली नैतिक जबाबदारी आहे, असे मत कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी व्यक्त केले. भाऊराव काकतकर महाविद्यालयात जागतिक मराठी भाषादिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व मराठीतील आई विषयाच्या कवितांचे वेगळेपण सांगितले.
अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस. एन. पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगून साहित्याचे वाचन कसे करावे, याबद्दल विवेचन केले. प्रारंभी रिहान मुल्ला, मानसी हुद्दार व स्फूर्ती बेळगली यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. डी. टी. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. कविता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पूजा रेमाण्णाचे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वैष्णवी पाटील व श्वेता मादार यांनी केले.