अंतिम तपासणीसाठी बेळगावला हलविल्याची माहिती : शुक्रवारी मध्यरात्रीच मुक्तता : प्रशासनाच्या सावळय़ा गोंधळाने संभ्रम
वार्ताहर/ तवंदी
पांगिरे-बी येथे मुंबईहून परतलेल्या माय-लेकीला क्वारंटाईन, त्यांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह, त्यांची रवानगी बेळगाव कोरोना कक्षात, चार दिवसानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांची घरी रवानगी, गावात माय-लेकींचे स्वागत व समाधानाचे वातावरण अन् दोन दिवसांनी पुन्हा माय-लेकीला हलविल्याच्या प्रकाराने पांगिरे-बी येथे गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शुक्रवारी हलविण्यात आलेल्या आईला बेळगाव येथून पुन्हा मध्यरात्रीच गावी सोडण्यात आले. तर मुलगीला निपाणीनजीक क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रशासनाच्या सावळय़ा गोंधळाने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई येथून परतलेल्या माय-लेकीसह अन्य काहीजणांना 18 मे रोजी क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब अहवाल येण्यापूर्वीच माय-लेकीला 31 मे रोजी क्वारंटाईनमधून मुक्त केले होते. त्या गावी परतल्यानंतर त्यांचा 7 जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बेळगाव येथील कोरोना कक्षात हलविले होते. यानंतर चारच दिवसात 10 मे रोजी अहवाल निगेटिव्ह आल्याने पांगिरे-बी येथे सोडण्यात आले होते. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले होते.
यानंतर शुक्रवार दि. 12 रोजी पुन्हा माय-लेकीला गावातून हलवून आईला बेळगाव येथे उपचारासाठी तर मुलीला निपाणीनजीक क्वारंटाईन करण्यात आले होते. या प्रकारामुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान यातील आईला शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा मुक्त करताना पांगिरे-बी येथे घरी सोडण्यात आले. तर मुलगीला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. हा सर्व प्रकार गोंधळात टाकणारा असल्याने नागरिकांना भीतीत टाकणारा आणि प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करणारा ठरत आहे.
अंतिम तपासणीसाठी बेळगावला हलविले
सदर महिलेची अंतिम तपासणी करणे बाकी असल्याने तिला बेळगाव येथे हलविण्यात आले होते. शुक्रवारीच रात्री अहवाल मिळाल्याने मध्यरात्री 1 च्या सुमारास गावी सोडण्यात आले. तर मुलगीला आणखी 10 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तालुका वैद्याधिकारी व्ही. व्ही. शिंदे यांनी सांगितले.