गुजरातमधील न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था / सूरत
गुजरातच्या सूरत येथील न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’वर कथित टिप्पणीवरून त्यांच्या विरोधात दाखल मानहानीच्या खटल्याप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी 29 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचा निर्देश दिला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एन. दवे यांनी हा निर्देश दिला आहे. राहुल गांधी यापूर्वी 24 जून रोजी सुनावणीस हजर राहिले होते. त्यानंतर दोन नव्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये न्यायालयात हजर राहत राहुल यांनी स्वतःच्या टिप्पणीसाठी दोष स्वीकारला नव्हता. राहुल गांधी 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हजर राहू शकतात, अशी माहिती त्यांचे वकील किरीट पानवाला यांनी दिली आहे.
सूरतमधील भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी भादंविचे कलम 499 आणि 500 अंतर्गत एप्रिल 2019 मध्ये राहुल यांच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. राहुल यांनी 2019 मधील एका प्रचारसभेला संबोधित करताना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे असते’ असे विधान करून मोदी समुदायाचा अपमान केला असल्याचा आरोप आमदारांनी केला होता. पुर्णेश मोदी हे सध्या गुजरातचे मंत्री आहेत.