प्रतिनिधी/ निपाणी :
यंदा मान्सूनपूर्व पावसाच्या समाधानकारक हजेरीनंतर मान्सूनदेखील वेळेत येण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. निपाणी तालुक्यात असलेल्या बंधाऱयाचे दरवाजे काही प्रमाणात खुले केले जात आहेत. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पाटबंधारे खाते सक्रीय झाल्याचे दिसत आहे.
तालुक्यातून वेदगंगा व दूधगंगा या नद्या प्रवाहित होतात. यापैकी वेदगंगा नदीवर जत्राट, सिदनाळ, खडकोळी तर दूधगंगा नदीवर बारवाड, कारदगा व मलिकवाड असे बंधारे आहेत. या बंधाऱयाचे दरवाजे काही प्रमाणात खुले केले जात आहेत. गतवर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाल्याने पाटबंधारे खात्याने बंधाऱयाचे दरवाजे खुले केले नव्हते. मात्र अचानक धरणक्षेत्रात व निपाणी भागातही सतत मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अचानक पाणीपातळी वाढली होती. त्यामुळे बंधाऱयांचे दरवाजे खुले करता आले नाहीत. परिणामी बंधाऱयावर पाणी येऊन वाहतूक बंद झाली होती.
यातून धडा घेतलेल्या पाटबंधारे खात्याने आतापासून काही प्रमाणात दरवाजे खुले केले आहेत. त्यामुळे पाणी पुढे प्रवाहित झाले आहे. गेल्यावर्षी पाऊस सुरू होण्यापूर्वी धरणातील पाण्याने तळ गाठला होता. तर नद्याही कोरडय़ा पडल्या होत्या. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे पाण्याचा वापर घटल्याने धरणांमध्ये सुमारे 25 टक्के पाणीसाठा तर नद्याही भरलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यास कमी वेळेतच पूरस्थितीची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आतापासूनच सतर्क झालेल्या प्रशासनाने मान्सूनपूर्व नियोजन हाती घेतले आहे.