मायक्रोसॉफ्टच्या 46 वर्षातील सर्वात मोठा व्यवहार : कँडीक्रश गेम बनविणाऱया कंपनीची करणार खरेदी
वॉशिंग्टन
टेक क्षेत्रासोबत सॉफ्टवेअरमध्ये दबदबा असणाऱया कंपन्यांपैकी मायक्रोसॉफ्ट आता गेम विश्वात उतरणार असल्याचे संकेत असून यामध्ये ‘कँडीक्रश’ व्हिडिओ गेम बनविणारी कंपनी ऍक्टिविजन ब्लिजार्डला 5.14 लाख कोटी रुपयांना (68.7 अब्ज डॉलर) खरेदी करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. मायक्रोसॉफ्टच्या एकूण 46 वर्षाच्या इतिहासामधील हा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्ससारख्या प्रसिद्ध गेमिंग कंसोलचीही ओनर आहे. यामुळे आगामी काळात गेम क्षेत्रात मायक्रोसॉफ्टचा दबदबा मजबूत राहणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
ऍक्टिविजन ब्लाजार्डच्या गेम लाईनअपमध्ये कॉल ऑफ डय़ूटी, कँडीक्रश, वॉरक्राफ्ट, डियाब्लो, ओव्हरवॉच आणि हार्थस्टोन आदीचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार सदरच्या व्यवहारानंतर मोबाईल, पीसी, कंसोल आणि क्लाउडवर गेमिंग व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत मिळणार आहे. तर मेटावर्ससाठी ‘बिल्डिंग ब्लॉक्स’ही प्रोव्हाइड करणार असल्याची माहिती आहे.
सदरच्या व्यवहारानंतर मायक्रोसॉफ्टला ऍक्टिविजनचे जवळपास 40 कोटी महिना गेमिंग युजर्स मिळणार असून यासोबतच जगातील काही सर्वात लोकप्रिय गेम्सवरही अधिकार राखता येईल.
जगातील तिसऱया नंबरची गेमिंग कंपनी
कँडिक्रशच्या खरेदीनंतर मायक्रोसॉफ्टला मिळणाऱया महसूलामध्ये चीनची टेंसेंट आणि सोनीनंतर जगातील सर्वात मोठी तिसऱया नंबरची गेमिंग कंपनी होणार आहे. सदरचा व्यवहार हा 30 जून 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये नेक्स्ट जनरेशन इंटरनेट म्हणजे मेटावर्समध्ये दबदबा कायम ठेवण्याच्या दृष्टीनेच हे पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे.