13 जणांच्या जमावाविरोधात गुन्हा
सोलापूर : प्रतिनिधी
घरासमोर गोंधळ करू नका असे म्हटल्यामुळे घरात घुसून मारहाण करीत १३ जणांनी माय-लेकीचा विनयभंग केला. दरम्यान, तिघांना मारहाण केल्याप्रकरणी १३ जणांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष पवार, नागेश पवार, सचिन पवार व इतर आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीच्या घरासमोर नेहमी तेथील मुले येऊन रात्री अश्लील शिवीगाळ करत, गोंधळ घालत होती. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीचा रोष मनात धरून बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोंधळ घालत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी गोंधळ घालू नका सांगितल्यामुळे वरील आरोपींसह आठ ते दहा जणांनी मिळून त्यांना मारहाण करू लागले. आरोपी संतोष पवार याने फिर्यादीचा गळा दाबला. त्यामुळे ते तेथून पळत येऊन घरात लपले तर आरोपींनी त्यांच्या दारावर लाथा मारून घरावर दगडफेक केली. तसेच घरात पत्नी व मुलीला मारहाण करत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फिर्यादी यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.