वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड यांचा प्रारंभीच्या पातळीवर आल्टो कारची एकूण विक्री 40 लाखाच्या घरात पोहोचली असल्याची माहिती कंपनीने गुरुवारी दिली आहे. सदर कारला सप्टेंबर 2000 मध्ये भारतीय बाजारात दाखल करण्यात आले होते.
मागील 16 वर्षापासून भारतामध्ये सर्वाधिक विक्री होणाऱया कारमध्ये या मॉडेलचा समावेश करण्यात आला असून आल्टोला जवळपास 76 टक्के खरेदीदारांची सर्वात प्रथम पसंती राहिल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी दिली आहे.
सर्वाधिक विक्री होणाऱया कारमध्ये आल्टोचा समावेश राहिलेला असल्यानेच सध्या कंपनीच्या या मॉडेलने जवळपास 40 लाख विक्रीचा टप्पा पार केल्याचे समोर आले आहे. ही कार पेट्रोल इंधनावर 22.05 किलोमीटर इतके अप्रतीम प्रति लिटर मायलेज देते. तसेच सीएनजीवरील कार 31.56 किलोमीटर प्रति किलोग्रॅम इतके मायलेज देते. यांची किमत दिल्ली शोरुममध्ये 2.95 लाख रुपयापासून 4.36 लाख रुपयांच्या जवळपास राहिलेली आहे.