मराठी मतदार यादी अखेर प्रसिद्ध पण असंख्य चुका, आक्षेपही नोंदवून घेणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर मराठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तात्कालिक मतदार यादीबाबत आक्षेप नोंदविल्यास स्वीकारण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. मात्र, कन्नड मतदार यादीचे सॉफ्टवेअरद्वारे भाषांतर करण्यात आले असून भाषांतर व्यवस्थित झाले नसल्याने मतदान केंद्राच्या शाळेचे नाव तसेच मतदान क्षेत्रांची नावे चुकीची प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे मराठी मतदार यादीचा बोध कसा घ्यायचा? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेची वॉर्डनिहाय तात्कालिक मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण केवळ कन्नड भाषेत प्रसिद्ध करण्यात आल्याने आक्षेप नोंदविण्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे मराठी भाषेतून मतदारयादी प्रसिद्ध करावी, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना म. ए. युवा समितीच्यावतीने देण्यात आले होते. आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे निवेदनाची दखल घेऊन महापालिकेने मराठी भाषेतील मतदारयाद्या छापण्यासाठी दिल्या होत्या. सदर मतदारयाद्या शनिवारी सायंकाळी महापालिकेकडे उपलब्ध झाल्या. रविवारी दिवसभर मतदारयाद्यांवर मनपाचा शिक्का मारून सज्ज करण्यात आले. त्यानंतर नागरिकांसाठी सोमवार सकाळपासून मतदार यादी उपलब्ध करण्यात आली आहे. आक्षेप नोंदविण्याच्या मुदतवाढीचा निर्णयदेखील प्रलंबित होता. पण मराठी भाषेतील मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या असल्याने मतदार यादीबाबत आक्षेप नोंदवून घेण्यासाठी दोन दिवस मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीबाबत आक्षेप नोंदवायचा असल्यास दोन दिवसात लेखी स्वरुपात हरकत दाखल करणे आवश्यक आहे. दि. 9 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मतदारयादी मराठी भाषिकांना गोंधळात टाकणारी
कन्नड मतदार यादीचे सॉफ्टवेअरद्वारे भाषांतर करण्यात आले आहे. पण भाषांतर व्यवस्थित झाले नसल्याने मतदान केंद्राच्या शाळेचे नाव तसेच मतदान क्षेत्रांची नावे चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे मराठी मतदार यादीचा बोध कसा घ्यायचा? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. वाक्मयरचना आणि व्याकरण तसेच काना-मात्रा पूर्णपणे चुकीचे असल्याने वाक्मयरचना चुकीची झाली आहे. ‘सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा’ असे असताना ‘सर्कारि मराठि हेण्णु मक्कळ शाले ऐडभागद कोणे’ असा उल्लेख मराठी यादीत करण्यात आला आहे. तसेच मारुती गल्लीऐवजी ‘मारति गल्लि’ असा मतदान क्षेत्राचा उल्लेख मतदार यादीवर करण्यात आला आहे. त्यामुळे ही मतदारयादी मराठी भाषिकांना गोंधळात टाकणारी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.