वार्ताहर/ मार्गताम्हाने
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाने कोविड 19 या विषयावर हेल्थ सेंटर व प्रबोधन मंच यांच्यातर्फे राष्ट्रीयस्तरावर प्रश्नमंजुषासारख्या स्पर्धा घेऊन सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांमध्ये कोरोना या जागतिक महामारीविषयी जागृती केली. या ऑनलाईन विशेष उपक्रमांना देशातील सुमारे 17 राज्यांतील विद्यार्थी व देशबांधवांचा विशेष प्रतिसाद लाभला आहे.
महाविद्यालयाच्या अंतर्गत मूल्यमापन समितीचे समन्वयक प्रा. डॉ. सुरेश सुतार यांच्या पुढाकाराने हे उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमध्ये MOOCS आणि MOODLES या विषयावर इतिहास विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन वेबिनार अंतर्गत भारत सरकारच्या ऑनलाईन कौशल्य शिक्षण अभ्यासक्रमांची माहिती शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासाठी मुंबई विद्यापीठाचे प्रा. मंदार भानुशे व प्रा. कनिश्क खत्री यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील ग्रंथपालांना ग्रंथालय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी ग्रंथालय विभागाच्यावतीने Emerging Technologies & Next Generation Libraries या विषयावर ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. यावेळी डॉ. मिता राठोड (सुरत), डॉ. नंदकुमार दहिभाते व किशोर इंगळे (पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले.
कोकणातील ग्रामदेवता ही संकल्पना राष्ट्रीय स्तरावर पोहचवणे व स्थानिक इतिहासाला चालना देण्यासाठी ‘कोकणातील ग्रामदेवता’ या विषयावर इतिहास विभागाच्यावतीने आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये मुंब्रा-मुंबई जी. आर. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. अंतर्गत मूल्यमापन समितीच्या वतीने नॅकच्या सुधारित कार्यप्रणालीवर राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा घेऊन महाविद्यालयातील प्राध्यापकांना नॅकच्या सुधारित कार्यप्रणालीवर मार्गदर्शन करण्यात आले.
इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी नानकशास्त्र या विषयावर इतिहास विभागाच्या वतीने ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. अर्थशास्त्र व वाणिज्य विभागांतर्फे ‘कोविड 19चा जागतिक उद्योग व व्यापारावर झालेला परिणाम’ आणि ‘डॉ. एस. आर. रंगनाथान यांचे ग्रंथालय क्षेत्रातील योगदान’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा व ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एन.एस.एस., प्रबोधन मंच व सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे ‘COVID -19 AWARENESS PROGRAME’ या नावाने माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. याचे संपादन महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश जांभारकर याने केले, तर कविता तामुन्डकर हिच्या आवाजात या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली.
मराठी विभागाच्या वतीने ‘प्र. के. अत्रे यांचे मराठी साहित्यातील योगदान’, राज्यस्तरीय इंग्रजी विभागाच्या वतीने ‘एच. जी. वेल्स यांचे इंग्रजी साहित्यातील योगदान’, एन.एस.एस. व सांस्कृतिक विभागातर्फे ‘भारतीय कला व संस्कृती’ या विषयावर राष्ट्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, इंग्रजी विभागाच्या वतीने ‘डी. एच. लॉरेन्स : रेल्म ऑफ रियालिझम’, तसेच हिंदी विभागाच्यावतीने ‘हिंदी और राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर राष्ट्रस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यासाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत, सहाय्यक समन्वयक प्रा. विकास मेहेंदळे, प्रा. डॉ. सत्येंद्र राजे आदींनी विशेष योगदान दिले. या उपक्रमाचे मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मधु चव्हाण यांनी कौतुक केले.