प्रतिनिधी/ मडगाव
सुमारे 2.63 लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन फातोर्डा पोलिसांनी दोन संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पैकी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील इंदोर येथील सुदाम नगर येथील गौरव कुमार शिवडे व इंदोर येथील लकी प्रसाद दास हीं त्या दोन संशयितांची नावे होत. मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 या दरम्यान 2.62 लाख रुपये किंमतीच्या मालाचा या दोन्ही संशयितानी अपहार केला असा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूर येथील महेंद्र कपूर (59) यांनी फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.
मडगावच्या कोलवा सर्कलजवळ असलेल्या टायटन शो रुममध्ये ही घटना घडली आहे. वरील दोघे संशयित आरोपी हे या शोरुममध्ये नोकरीला होते. तक्रारदार कपूर यांनीच त्यांना कामावर ठेवलेले होते. या शोरुममध्ये विविध प्रकारची घडय़ाळे, सन ग्लास, विविध कंपनीचे अत्तर, यासारखे सामान होते. या सामानाची या दोन्ही कर्मचाऱयांनी अफरातफर केली असे या तक्रारीत म्हटलेले आहे.
अशाप्रकारची अफरातफर केल्यामुळे तक्रारदाराला 2,62,866 रुपये किंमतीचा भुर्दंड सहन करावा लागला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरील तक्रारदाराने फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 408 (कर्मचाऱयाकडून विश्वासघात करणे) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास आरोपीला जास्तीत ज्यास्त 7 वर्षाची कैदेची शिक्षा आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
एकाला अटक
दरम्यान, फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणातील दुसरा आरोपी लकी प्रसाद दास याला अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा त्याची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाने त्याला 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.