शासनाच्या नियमानुसार होणार देवतांचे दर्शन
भाविकांनी सहकार्य करावे – देवस्थान ट्रस्टचे आवाहन
प्रतिनिधी / मालवण:
मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण व श्री देव रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडव्यानिमित्ताने 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देवस्थान ट्रस्टला अटी व शर्तींचे पालन करून पालखी सोहळा करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या सूचनांचे पालन करून हा सोहळा होणार असल्याचे देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
सामाजिक अंतर राखणे, भाविकांनी मास्कचा वापर करणे, दर्शनासाठी रांगेचा वापर करणे अशाप्रकारे या वर्षीचा सोहळा होणार आहे. भाविकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
असा रंगणार पालखी सोहळा
ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा दीपावलीनिमित्त पालखी सोहळा सोमवारी, 16 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिर येथून सुरू होणार आहे. त्यानंतर देव भूतनाथ मंदिर (वायरी), देव मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) मार्गे दांडेश्वर मंदिरात पोहोचणार आहे. ही पालखी समुद्र किनाऱयामार्गे श्री देवी काळबादेवी मंदिर (मेढा), जोशी मांड येथून सोमवारपेठेतील रामेश्वर मांड येथे येईल. या ठिकाणी रात्री पालखी दर्शनासाठी थांबेल. त्यानंतर ही पालखी बाजारपेठ-भरडमार्गे देऊळवाडा मंदिरात जाईल.