पालिका विषय समिती निवडणूक : सत्ताधारी शिवसेना-भाजप आमने-सामने
बांधकाम सभापतीपदाची / यतीन खोत यांना लॉटरी: आरोग्य सभापतीपदी पूजा सरकारे
प्रतिनिधी / मालवण:
मालवण पालिकेच्या शनिवारी झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष पालिकेत सत्ताधारी असतानाही समोरासमोर लढल्याने दोघांनाही ‘कही खुशी-कही गम’ याचा प्रत्यय आला. पालिकेतील प्रतिष्ठेच्या बांधकाम सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक यतीन खोत यांची बिनविरोध निवड झाली, तर आरोग्य सभापतीपदी भाजपच्या पूजा सरकारे यांनी शिवसेनेच्या मंदार केणी यांचा पराभव करीत विजय मिळविला. महिला बालविकास सभापती पद रिक्त राहिले. गटनेता कोण यावर निर्माण झालेला संघर्ष जरी भाजपच्या गणेश कुशे यांनी ज्ंिांकला, तर बांधकाम समिती सभापतीपदाचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने त्यांना धक्का बसला.
निवड समितीसाठी शनिवारी सकाळी झालेल्या सभेत शिवसेनेकडून नवीन गट स्थापन करून सदस्य सुचविले, तर भाजपचे गणेश कुशे यांनी आपणच गटनेते असल्याने सदस्य सुचविले. यावर निर्णय देताना प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी युतीचे गटनेते म्हणून गणेश कुशे हेच असल्याचे जाहीर केले. यामुळे गेले अनेक दिवस ‘गोड बातमी’ देण्यासाठी धडपडत असलेल्या शिवसेनेवर भाजपने मात केल्याचे चित्र दिसून आले. शिवसेनेच्या स्वतंत्र गटाला मान्यताच नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. गणेश कुशे यांच्याकडेच युतीचे दोर आल्याने त्यांनी बांधकाम सभापतीपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी अर्ज केला होता. तर आरोग्य सभापतीपदी पूजा सरकारे यांचा अर्ज केला होता. शिवसेनेकडून बांधकाम सभापतीसाठी यतीन खोत आणि आरोग्य सभापती पदासाठी मंदार केणी यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेना-भाजप युतीची पालिकेत सत्ता असताना आजच्या निवडीत शिवसेना-भाजप युती तुटलेली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. शिवसेनेकडून निश्चीत करण्यात आलेल्या गटाला कुशे यांनी आक्षेप नोंदविला होता. तर कुशे हे गटनेते नाहीत, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
युतीच्या दोन गटनेत्यांची पत्रे
प्रांताधिकारी यांनी सकाळी 11 वाजता पालिकेच्या नगरसेवकांच्या सभेत पालिकेत एक दहा सदस्यीय आणि एक सहा सदस्यीय असे दोन गट कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे दहा सदस्यीय गटाने दोन नावे तर सहा सदस्यीय गटाने एक नाव विषय समितींसाठी सुचवावे, असे स्पष्ट केले. यावर गणेश कुशे यांनी आपण गटनेते असल्याने नावे सुचविण्याचा अधिकारी आपल्यालाच आहे, असे स्पष्ट करत गटस्थापनेबाबतची सर्व कागदपत्रे सादर केली. तर तृप्ती मयेकर यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी आपण असून सदस्य सुचविण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत, असे पत्र सादर केले. कुशे यांनी आपणच गटनेते असल्याबाबत आपली बाजू मांडली. तर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना केली. सुदेश आचरेकर यांनीही राजपत्रात नोंद झालेली व्यक्तीच अधिकृत गटनेते असतो, असे सांगत कुशे यांची बाजू रास्त असल्याचे सांगितले.
मंदार केणी यांची दिली सदस्यांची नावे
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी गटाचे गटनेते मंदार केणी यांनी विषय समिती यांवर द्यायच्या प्रत्येकी एक अशा तीन सदस्यांची नावे प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केली. केणी हे सध्या शिवसेनेत दाखल असले तरी विरोधी गटाच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली असल्याने त्यांच्याकडून प्रत्येक समितीवर एक सदस्य सुचविण्यात आला. यात बांधकाम समितीवर यतीन खोत आणि आरोग्य समितीवर आपले नावे सुचविले.
गणेश कुशे यांचा अर्ज बाद
विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी गणेश कुशे यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जावर अनुमोदन म्हणून उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती राजन वराडकर यांनी सही केली होती. याला शिवसेनेच्यावतीने आक्षेप घेतला. हा आक्षेप प्रांताधिकारी यांनी मान्य करीत कुशे यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. कुशे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने शिवसेनेकडून बांधकाम सभापती पदासाठी सादर केलेल्या यतीन खोत यांचा उमेदवारी अर्ज वैध असून ते बिनविरोध विजयी झाल्याचे प्रांताधिकारी यांनी जाहीर केले. यामुळे भाजपच्या गोटात सन्नाटा पसरला होता. गटनेते पदाचा अधिकारी कायम राहिला होता. मात्र, बांधकाम सभापती पद गेले होते. तर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येवून स्वाभिमान पक्षात गेलेले आणि त्यानंतर शिवसेनेत दाखल झालेल्या यतीन खोत यांना यानिमित्ताने लॉटरी लागली होती. पालिकेच्या सभागृहात प्रथमच ते सभापती म्हणून कार्यरत होणार आहेत.
स्थायी समितीवर शिवसेनेचे वर्चस्व
पालिकेच्या पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थायी समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आले आहे. यात बांधकाम सभापती आणि नगराध्यक्ष अशी दोन मते तर भाजपकडे पाणीपुरवठा सभापती व आरोग्य सभापती ही दोन मते राहणार आहेत. समसमान मतदानासाठी विषय गेल्यास नगराध्यक्ष आपले दुसरे मत वापरू शकणार आहेत. यामुळे शिवसेनेकडे तीन आणि भाजपकडे दोन मते राहणार आहेत. गेले वर्षभर स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व होते. आता शिवसेनेने त्यावर मात केली आहे.
आयुक्तांकडे अपीलाची संधी
प्रांताधिकारी यांनी गटनेते पदाच्या दिलेल्या निर्णयावर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आक्षेप नोंदविला. तर उमेदवारी बाद केल्याच्या कार्यवाहीवर गणेश कुशे यांनी आक्षेप नोंदविला. यावर प्रांताधिकारी यांनी पुढील 48 तासात या निर्णयावर आयुक्तांकडे जावून हरकत नोंदवू शकता, असे स्पष्ट केले. पुढील 48 तास म्हणजे सभा सुरू होणार तीन वाजता त्यानंतर सभा संपल्यानंतर इतिवृत्त लिहून पूर्ण झाल्यानंतर इतिवृत्त ताब्यात घेवून हरकत नोंदविण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. यात आज रविवार असल्याने 24 तास जाणार आहेत.
विषय समिती पुढीलप्रमाणे
बांधकाम सभापती – यतीन खोत (शिवसेना), सदस्य – गणेश कुशे व आप्पा लुडबे (दोन्ही भाजप)
आरोग्य सभापती – पूजा सरकारे (भाजप), सदस्य – मंदार केणी (शिवसेना), आप्पा लुडबे (भाजप).
पाणी पुरवठा – उपनगराध्यक्ष राजन वराडकर (भाजप, पदसिद्ध), पंकज सादय़े (शिवसेना), दर्शना कासवकर (शिवसेना).