प्रतिनिधी /वास्को
मुरगाव बंदरातून पॉटेश घेऊन झुआरीनगरच्या दिशेने निघालेल्या एका मालवाहु ट्रकमधून सारा माल वास्को कदंब स्थानकासमोरील रस्त्यावर सांडण्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. मोठय़ा प्रमाणात पॉटेश रस्त्यावर सांडल्याने रस्ता साफ करण्यासाठी अग्नीशामक दलाची मदत घ्यावी लागली.
एक मालवाहू ट्रक पॉटेश हा युरीया खत उत्पादनासाठी वापरण्यात येणारा रासायनिक घन पदार्थ भरून मुरगाव बंदरातून बाहेर पडला होता. मात्र, वाटेत कदंब स्थानकासमोरील रस्त्यावर या ट्रकचा फाळका सुटला. फाळका सुटल्याने या ट्रकमधील अर्ध्याहून अधिक माल रस्त्यावर सांडला. ट्रक धावत असताना हा माल पडल्याने सुमारे शंभर मिटर अंतरापर्यंत पसारा निर्माण झाला. सकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रस्त्यावर वाहतुक नव्हती. त्यामुळे फारशी अडचणी निर्माण झाली नाही. परंतु उजाडण्याची वेळ जवळ आली होती. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर सांडलेला पॉटेश माल संबंधीत कामगारांनी भराभर उचलण्यास सुरवात केली. तरीही रस्त्यावर घाण निर्माण झाली होती. शेवटी अग्नीशामक दलाच्या मदतीने हा रस्ता धुवून साफ करण्यात आला.