संसर्ग वाढू नये यासाठी कलाकारांचा निर्णय
वार्ताहर /माशेल
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा अजून शून्यावर आलेला नसल्याने तसेच कोविडच्या तिसऱया लाटेपासून सुरक्षितता बाळगण्यासाठी चतुर्थीनिमित्त माशेल भागात बनविण्यात येत असलेले गणेश देखावे यंदाही बनविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आकर्षक देखाव्यांचे दर्शन यंदाही दुर्लभ झाले आहे. पारंपरिक देखावे पाहण्याच्या निमित्ताने संसर्ग वाढू नये यासाठी माशेल पंचक्रोशीतील श्रीगणेश दर्शन देखावे साकारणार आलेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण गोव्यातील लोकांना देखावे पहायला मिळाले नाही.
माशेल भागातील 21 दिवस उत्सव साजरे करणारे बहुतेक गणपती देखावे यंदा साकारण्यात आलेले नाही. कलाकारांनी यंदा गणेशचतुर्थी आपल्या घरीच अत्यंत साध्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वांनी स्वस्त रहा, घरीच रहा असा संदेश दिलेला आहे.
पुढच्या वर्षी भव्य देखावे साकारणार
माशेल येथील नावेलकर बंधुनी मागील 44 वर्षाच्या कार्यकाळात आपल्या गणपती देखाव्याच्या साधनेत कधीच खंड पडल्याचे ऐकिवात नसल्याची माहिती दिली. 1976 सालापासून चलचित्र, गणपतीमूर्ती त्यानंतर एकवीस दिवशीय गणपती देखावा असा गणेशचतुर्थी उत्सवाचा कार्यक्रम असायचा. यंदा कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता उत्सव मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक अंतर राखा, स्वस्त रहा असा संदेश गणेशभक्तांना त्यांनी दिला आहे. आमच्या कलेची कदरदान करणारे लोक सुखरूप रहावे. पुढील वर्षी मोठय़ा उमेदीने अथक मेहनत घेत कलेच्या माध्यमातून भाविकांना आश्चर्याचा धक्का देणारे देखावे सादर करू, जेणेकरून मागील वर्षी कोरोनामुळे खंड पडलेला काळही लोकांच्या विस्मरणात जाईल, असे ते म्हणाले.