प्रतिनिधी/ मडगाव
मासळीसाठी खोल समुद्रात मच्छिमाऱयांमध्ये अनेकदा ‘युद्ध’ होते याचा एक किस्सा हल्लींच उघडकीस आला आहे.
गोव्याचे जे. फर्नाडिस हे आपला ट्रॉलर घेऊन खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. बराच वेळ खवळलेल्या समुद्रात थांबून त्यांनी ट्रॉलरवर बरीच मासळी गोळा केली. काही तासातच ते ती जागा सोडून गोव्याच्या दिशेने येणार होते.
इतक्यात, 20 सागरी मैल खोल समुद्रात असलेल्या त्यांच्या दिशेने एक ट्रॉलर येऊ लागला. हा ट्रॉलर जवळ आला तेव्हा त्या ट्रॉलरचे नाव ‘ॐकार’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या ट्रॉलरवर आणखी काही कर्मचारी होते. हे कर्मचारी श्री. फर्नाडिस यांच्या ट्रॉलरवर बेकायदेशीररित्या चढले. फर्नाडिस यांना दमदाटी केली, धमकी दिली आणि अथक मेहनतीने खोल समुद्रातून गोळा केलेली ती मासळी बळजबरीने नेली, इतकेच नव्हे तर या ट्रॉलरवर असलेली संपर्क यंत्रणाही नेली. मासळीसह चोरुन नेलेल्या या ऐवजांचा आकडा सुमारे 9 लाख रुपये असावा असे फर्नाडिस यांचे म्हणणे.
फर्नाडिस खोल समुद्रातून वास्को समुद्रकिनाऱयावर आल्यानंतर त्यांनी हार्बर पोलिसांना घडलेली घटना कथन केली. हार्बर पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला. तपास हाती घेतला आणि आयएनडी-एमएच-5 एमएम-3348 क्रमांकाचा ‘ॐकार’ नावाचा ट्रॉलर जप्त करुन गोव्यात आणला.
कालांतराने हा ट्रॉलर मालवण सिंधदुर्ग येथील नारायण भगवान अडकर (42) याचा असल्याचे तपास यंत्रणेला समजले. नारायण अडकर यांनी गोव्याच्या न्यायालयाकडे अर्ज केला. जप्त केलेला ट्रॉलर मुक्त करण्यात यावा अशी त्या अर्जांत विनंती करण्यात आली.
विजयलक्ष्मी शिवोलकर यांच्या न्यायालयाने तपास यंत्रणेचे म्हणणे आणि अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेतले. तपास यंत्रणेचे म्हणणे असे होते की एकदा हा ट्रॉलर मुक्त केला तर अर्जदार या ट्रॉलरचा कायापालट करेल. त्यानंतर तो ट्रॉलर हाच का, असे होईल. शिवाय खटल्याच्या कामकाजाच्यावेळीही अडथळा ठरेल आणि म्हणून हा ट्रॉलर मुक्त करु नये.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या न्यायालयाने 20 लाख रुपयांच्या इंडेम्नीटी बॉण्डवर हा ट्रॉलर मुक्त करण्याचा आदेश दिला. शिवाय ट्रॉलरचा रंग बदलता कामा नये, तो विकता कामा नये तसेच ज्या ज्यावेळी कोर्ट किंवा तपास यंत्रणेला या ट्रॉलरची गरज भासेल तेव्हा हा ट्रॉलर सादर करण्यात यावा अशा अटी घालून न्यायालयाने ट्रॉलर मुक्त करण्याचा आदेश दिला.