150 कोटी फेस मास्क समुद्रात पोहोचणार : 6800 टनाहून अधिक प्लास्टिक प्रदूषण होण्याची भीती
कोरोना विषाणू आरोग्यासह अनेक प्रकारच्या बहुस्तरीय समस्या घेऊन आला आहे. एका अहवालानुसार वापरण्यात आलेल्या मास्कमुळे यंदा सागरी पर्यावरण अत्यंत अधिक प्रदूषित होणार आहे. सुमारे 150 कोटी वापरण्यात आलेले फेस मास्क विविध माध्यमांमधून समुद्रात पोहोचणार आहेत.
या हजारो टन प्लास्टिकमुळे समुद्रात फैलावलेल्या प्रदूषणाने सागरी जीवसृष्टीलाही प्रचंड नुकसान होणार आहे. हाँगकाँगची पर्यावरण संरक्षण संस्था ओशन्स इंडियाने यासंबंधी एका जागतिक संशोधनाच्या आधारावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
5200 कोटी मास्कची निर्मिती
अहवालानुसार कोरोना विषाणूमुळे यंदा सुमारे 5200 कोटी मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. पारंपरिक गणनेच्या आधारावर याचा 3 टक्के हिस्सा समुद्रात पोहोचणार आहे. सिंगल युज फेस मास्क मेल्टब्लॉन प्रकारच्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले असतात. याची संरचना, धोके आणि संसर्गामुळे त्यांचा पुनर्वापर करणे अत्यंत अवघड असते. या मास्कनी कचऱयाचे स्वरुप घेतल्यावर ते निष्काळजीपणे कुठेही फेकून दिल्यास किंवा आमचे कचरा व्यवस्थापन अपयशी ठरल्यास ते महासागरात पोहोचतात. प्रत्येक मास्कचे वजन 3 ते 4 ग्रॅम
असते.
जीवघेणे प्रदूषण
या स्थितीत सुमारे 6800 टनाहून अधिक प्लास्टिक प्रदूषण निर्माण होणार आहे. हे प्लास्टिक नष्ट करण्यास सुमारे 450 वर्षे लागणार आहेत. मास्कला कानात लावण्यासाठी लावलेला रबरी किंवा प्लास्टिकचा दोर सागरी जीवांसाठी धोकादायक ठरत आहे. ऑगस्ट महिन्यात मियामी समुद्रकिनाऱयावर डिस्पोजेबल मास्कमध्ये अडकून मृत झालेला पफर मासा आढळून आला होता. सप्टेंबरमध्ये ब्राझीलमध्ये एक मृत पेंग्विन सापडला होता, ज्याच्या पोटात मास्क आढळून आला होता.
पुनर्वापरक्षम मास्क
या धोक्यापासून वाचण्यासाठी वारंवार वापरात येणारे मास्क परिधान करण्याचा सल्ला अहवालात देण्यात आला आहे. ब्रिटनच्या रॉयल सोसायटीने प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मास्क फेकण्यापूर्वी त्याचा कानासाठीचा स्ट्रप काढून टाकावा, अशी सूचना केली आहे.