‘मिग-21’च्या सारथी ठरल्या ‘नारी शक्ती’
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हवाई दलातील पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांसह देशभरातील 16 महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्कार्थींमध्ये भावना कांत, मोहना जितरवाल आणि अवनी चतुर्वेदी यांचा समावेश आहे. आम्ही कठोर मेहनतीमुळेच हे यश प्राप्त केले असून, भविष्यात आम्हाला देशाची सेवा करायची आहे, अशी भावना पुरस्कारप्राप्त लढाऊ वैमानिकांनी व्यक्त केली.
महिला दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळय़ात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गजेंद्र सिंह शेखावत उपस्थित होते, याप्रसंगी 2018 मध्ये भारतीय वायुसेनेत पहिल्या महिला लढाऊ वैमानिक म्हणून सेवेत रुजू झालेल्या मोहना जितरवाल, अवनी चतुर्वेदी आणि भावना कांत यांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या तिन्ही वैमानिकांचा वायुसेनेतील स्क्वॉड्रनमध्ये समावेश झाला होता. त्यानंतर 2018 मध्येच मिग-21 विमानाच्या वैमानिक म्हणून या तिघींनीही उड्डाण केले होते.