शहर पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाची सयुंक्तिक कारवाई
प्रतिनिधी / मिरज
शहरातील ब्राम्हणपुरी येथे हरबा तालमीजवळ सुमारे एक लाख रुपयांचे भेसळयुक्त तूप आणि बटर जप्त करण्यात आले. शहर पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्तिकपणे ही कारवाई केली. याप्रकरणी कर्नाटकातील दोघाना अटक करण्यात आली आहे.
नागलिंगा दुर्गाप्पा मुथ्थलकर (वय ३५) णि चंद्रशेखर गुडलाप्पा पल्लेदौर (वय ३८ दोघे रा. दुर्गाम्मा गुडी, बेनकल ता. हळ्ळी जि. विजापूर कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
हरबा तालिम जवळ एका बंद खोलीत बनावट तुप व बटर तयार करत असल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकला असता २६९ किलो तूप व ४ किलो बटर असा एक लाख, आठ हजार, ८८० रूपयांचा माल मिळून आला. जप्त केलेला माल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. सदर दोघांकडे चौकशी केली असता दोघेही उडवाउडवी उत्तरे देवू लागले. कसून केल्यानंतर सदरचे भेसळयुक्त तूप आणि बटर कर्नाटकातून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.