मिरज / प्रतिनिधी
फेसबुकवरून स्विफ्ट कार कमी किमतीत विकत देण्याचे अमिष दाखवत बेळंकी येथील दिलीप शंकर कोथळे ( वय ३६) यांना एक लाख २२ हजार, ७५० रूपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी प्रशांत यादव आणि सुभाष चंद ( दोघे रा. औरंगाबाद) यांच्या विरोधात ग्रामीण पोलीसात फिर्याद दिली आहे.
दिलीप कोथळे यांनी फेसबुकवर स्विफ्ट गाडी विक्रीची जाहिरात पाहिली होती. त्यातील मोबाईल क्रमांकावर त्यांनी फोन करून गाडीची किंमत विचारली. गाडी स्वस्तात देण्याचे अमिष त्यांना दाखविण्यात आले. यासाठी त्यांना गाडीची कागदपत्रेही दाखवण्यात आली. व्यवहार ठरल्यानंतर संबंधीत इसमांनी गाडी पाठविण्यासाठी आगाऊ रक्कम भरण्यास सांगितले. कोथळे यांनी ही रक्कम भरली. त्यानंतरही चार - पाच वेळा गाडीसाठी संबंधीत इसमांनी कोथळे यांच्याकडून पैसे मागुन घेतले. कोथळे यांनी एक लाख २२ हजार ७५० रूपयांचा भरणा केला. मात्र, तरीही त्यांना गाडी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी औरंगाबाद येथील प्रशांत यादव आणि सुभाष चंद यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.