शहरात शंभर खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय आणि घाट रोडवरील उड्डाणपूलाचा कामात समावेश
प्रतिनिधी / मिरज
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतून मिरज विधानसभा मतदार संघात गेल्या दोन वर्षात 206 कोटी, 17 लाख रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली असून, यापैकी 28 कोटी, 28 लाख रुपयांची कामे सुरू झाली आहेत. उर्वरीत कामे भाजपा मधील ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते उद्घाटन होउन सुरू होतील, अशी माहिती मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकारांना दिली. 46 कोटी, 73 लाख रुपये खर्चाच्या शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
मिरज विधानसभा मतदार संघात कोटय़वधी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळविण्यात आम्हाला यश आले आहे. 2020 ते 2022 या दोन वर्षाच्या कालावधीत आमदार फंडातून सात कोटी, 81 लाख, 57 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. तर जिल्हा नियोजनमधून चार कोटी, 37 लाख तिर्थक्षेत्र आणि जनसुविधा म्हणून 75 लाख, 25ः15 योजनेतून एक कोटी, 50 लाख, केंद्रीय रस्ते निधीतून सात कोटी, 93 लाख, 43 हजार तर नाबार्ड अंतर्गत सोनी गावाजवळ लहान पूल बांधकामासाठी तीन कोटी, 41 लाख आणि कवलापूर तलाव सुशोभीकरणासाठी दोन कोटी, 50 लाख असा 28 कोटी, 28 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यापैकी काही कामे पूर्णत्वाकडे तर काही कामे सुरू झाली असल्याचे आमदार खाडे म्हणाले.