शिस्तभंगाबद्दल रुग्णालय प्रशासनाकडून विद्यार्थांना नोटिसा
मिरज / प्रतिनिधी
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना बाधित झाल्याने उपचार घेणार्या ९७ विद्यार्थ्यांपैकी काहीजण कोविड आंतरंरुग्ण विभागात दंगा, सामुहीक नृत्य व क्रिकेट खेळत असल्याचे सीसी टिव्हीत दिसून आले. या विद्यार्थ्यांना शिस्तभंग कारवाईची नोटिस सिव्हिल प्रशासनाने बजावली आहे.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकाचवेळी तब्बल ९७ विद्यार्थी कोरोना बाधित झाले. वैद्यकीय विद्यार्थी व आंतरवासिता कोविड बाधीत रुग्णांसाठी जूना पॅथॉलॉजी व स्त्री वैद्यकशास्त्र आंतररुरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याने या घटनेच्या चौकशीसाठी आलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी सीसीटीव्हीतून वॉर्डाची पाहणी केली असता वॉर्डात कोरोना बाधित विद्यार्थी दंगा नाच करीत असल्याचे दिसले. काही विद्यार्थी दंगामस्ती , चित्रपट गीतावर सामुहीक नृत्य व क्रिकेट खेळल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या कृत्याबद्दल सिव्हील प्रशासनाने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.