काम पूर्ण होऊन तीन महिने झाले तरी कंत्राटदाराचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मिरवणूक मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱया रामलिंग खिंड रस्त्याशेजारी डेकोरेटिव्ह पथदिपांची उभारणी करण्यात आली. पण तीन महिने उलटले तरी हे पथदीप अद्यापही बंदच आहेत. शहरात उभारण्यात आलेल्या ठिकठिकाणचे पथदीप सुरू झाले. मात्र, रामलिंग खिंड गल्लीतील पथदीप सुरू करण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे.
स्मार्ट शहर बनविण्यासाठी रस्त्यांचा विकास आणि डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विजेची बचत करण्यासाठी शहरांतर्गत एलईडी दिवे बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रस्ताव राबविण्यात येत असून डेकोरेटिव्ह पथदीप आणि एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. चार महिन्यांपूर्वी बाजारपेठेतील रस्त्यांवर पथदीप बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. रामदेव गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, काकतीवेस रोड, गणपत गल्ली अशा विविध ठिकाणी डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले होते. यापैकी ठराविक गल्ल्यांतील पथदीप सुरू करण्यात आले आहेत. पण रामलिंग खिंड गल्लीतील पथदीप सुरू
नाहीत.
रामलिंग खिंड गल्लीचा रस्ता मिरवणूक मार्ग म्हणून ओळखला जातो. श्री गणेश विसर्जन मिरवणूक, शिवजयंती मिरवणूक या रस्त्यावरून काढण्यात येते. नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे मिरवणूक मार्गावर डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात यावेत, याकरिता माजी महापौर सरिता पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार मिरवणूक मार्गावर पथदीप बसविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली होती.
चार महिन्यांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले होते. पथदीप बसविण्याचे काम पूर्ण झाले असून बाजारपेठेतील विविध ठिकाणांचे पथदीप सुरू करण्यात आले आहेत. पण रामलिंग खिंड गल्लीतील पथदीप अद्याप सुरू झाले नाहीत. त्यामुळे माजी महापौर सरिता पाटील यांनी अधिकाऱयांकडे चौकशी केली असता विद्युत मीटर व विद्युत जोडणी झाली नसल्याने पथदीप सुरू करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. विद्युत मीटर बसविण्याकडे कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या हे पथदीप केवळ शोभेचे बनले आहेत. विद्युत जोडणीची प्रक्रिया पूर्ण करून पथदीप सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.