शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
अहमदनगर येथील मिल्ट्री रेकॉर्डच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी लावतो, असे सांगून 1 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संजय वसंत घाडगे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून दुसरा संशयित हा संजय घाडगे याचा मेहूणा असून त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता समजू शकलेला नाही.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, हा संपूर्ण प्रकार दि. 11 जून 2020 ते दि. 25 जूलै 2020 या कालावधीत घडला आहे. संजय हणमंत बर्गे (वय 52, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संजय वसंत घाडगे (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) यांचा मेहूणा (नाव व पत्ता माहित नाही) याने मी नगर येथील मिल्ट्रीच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये कमांडिंग ऑफिसर यांचा पीए असून ’मी तुमचा मुलगा आकाश याला मिल्ट्री रेकॉर्ड ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून भरती करतो,’ असे संजय बर्गे यांना सांगितले. यानंतर बर्गे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक (पोवई नाका शाखा) आणि कर्नाटक बँकेच्या खात्यातून घाडगे याच्या खात्यावर रोख तसेच एनएफटीद्वारे 1.55 लाख रुपये भरले. यानंतर संजय घाडगे याने त्याचा मेहुण्याला फोन लावला आणि संजय बर्गे यांना मोबाईल कॉन्फरन्सवरती घेवून ’तुम्हाला अपॉईंटमेंट लेटर पोस्टाने येईल,’ असे सांगितले. दरम्यान, बरेच दिवस झाले तरी मुलगा आकाश याला अपॉईंटमेंट लेटर न आल्याने त्याची विचारणा संजय बर्गे यांनी संजय घाडगे याला केली. मात्र, घाडगे याने तुम्ही मला येथून पुढे भरतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची विचारणा करुन त्रास देवू नका. मी तुमच्या विरुध्द खोटे गुन्हे दाखल करेन अशी धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यामुळे संजय बर्गे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संजय वसंत घाडगे आणि त्याच्या मेहुण्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दोघांनाही अटक झालेली नव्हती. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.